कराड – पुणे-बेंगलोर महामार्गावर मालखेड फाटा ता. कराड येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाला. मंगळवार दि. 29 रोजी सायंकाळी हा अपघात झाला. मदन दिलीप पवार (वय अंदाजे 25) रा. मालखेड ता. कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने मालखेडसह परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावरुन मंगळवारी सायंकाळी मदन पवार हा दुचाकीवरुन मालखेडला निघाला होता. त्यादरम्यान एक ट्रक महामार्गावरच पंक्चर झाला होता. त्या ट्रकची आणि दुचाकीची मालखेडजवळच धडक झाली. या अपघातात मदन पवार याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतुक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आशीष जाधव यांनी अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी भेट देवून वाहतुक पुर्ववत केली.