चंद्रपूर: दोन वाघांच्या थरारक झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दूसरा वाघ गंभीररित्या जखमी झाला आहे. 14 नोव्हेंबर रोजी चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत खडसंगी नियतक्षेत्रातील वाहनगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात वाघांची झुंज सुरू होती. यावेळी वाघाला बघण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
मृत्युमुखी पडलेला वाघ हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बजरंग असल्याचे समोर आले आहे. तर दुसरा वाघ जखमी झाला आहे. शेतात हा थरार घडत असताना आसपास शेतकरी कामात गुंतलेले होते. पण आवाज झाल्याने ते सतर्क आणि गावकरी घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना एक वाघ तेथून जखमी अवस्थेत जाताना दिसला. तर दूसरा वाघ मृतवस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले.
छोटा मटका नावाच्या वाघाने एका बैलाची शिकार केली होती. या शिकारीवरून या दोन्ही वाघांमध्ये टोकाची झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. धिप्पाड शरीरयष्टीचा ‘बजरंग’ हा वाघ ताडोबाची शान होता. ताडोबा हे ‘बजरंग’चे साम्राज्य होते. मात्र या झुंजीत तो अपयशी ठरला. यामुळे छोटा मटका वाघ बजरंगवर भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मृतावस्थेत आढळलेला वाघ हा सुमारे सात वर्षांचा असून त्याच्या शरीरभर जखमांच्या खुणा आहेत. चावा घेतल्याचे स्पष्टपणे दिसत असून झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्र झाल्याने वाघाचे शवविच्छेदन बुधवारी म्हणजे आज केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.