काबूल: अफगाणिस्तानच्या पूर्व लोगर प्रांतात गुरुवारी रात्री उशिरा एक आत्मघाती हल्ल झाला त्यात नऊ जण ठार झाले तर अन्य चाळीस जण जखमी झाले. पुल-ई-आलम या ठिकाणी हा स्फोट झाला. ही त्या प्रांताची राजधानी आहे. एका पोलीस चौकीला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता.
मृतांमध्ये सहा पोलीस कर्मचारी आणि तीन नागरिक आहेत. जखमी झालेल्यांमध्येही अनेक पोलीस कर्मचारी आहेत. मृतांच्या संख्येविषयी सरकारी पातळीवरूनच वेगवेगळी आकडेवारी दिली जात आहे. प्रांतिक प्रमुखाने या स्फोटात किमान पंधरा जण ठार झाले असल्याचे म्हटले आहे.
तालिबानने ईदच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांची शस्त्रसंधी जाहीर केली असताना हा हल्ला कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, पण या स्फोटात आपला हात असल्याची जबाबदारी तालिबानने नाकारली आहे.
तालिबानचे प्रवक्ते झैबुल्ला मुजाहिद यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील युद्धाची स्थिती संपूच नये असे ज्यांना वाटते अशा शक्तीनींची हा हल्ला केला आहे, आम्ही मात्र शस्त्रसंधीच्या घोषणेशी प्रामाणिक आहोत.