मंचर -चास-गणेशवाडी (ता. आंबेगाव) येथे पैसे लावून विनापरवाना जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरोधात घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 98 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चास-गणेशवाडी येथे रामदास मारुती भोर (वय 49), तुकाराम जयवंत भोर (वय 42), दत्तात्रय ज्ञानेश्वर भोर (वय 39), दत्तात्रय काशिनाथ पिंगळे (वय 50, रा. साकोरे), महेंद्र प्रकाश माटे (वय 29), प्रशांत शंकर बारवे हे शेगरमळा येथे उसाच्या शेतातील पोल्ट्री फार्मच्या बराखीच्या अडोशाला विनापरवाना पैसे लावून जुगार खेळताना आढळले.
तेथे 4 हजार 200 रुपये रोख रक्कम, पत्त्यांच्या पानांचे दोन कॅट, एक हाफ साईज एकेरी वहीच्या दोन पानांवर जुगाराचे आकडे लिहिलेले, एक पेन, 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, 14 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल, 45 हजार रुपये किमतीची मोटार सायकल, 20 हजार रुपये मोटार सायकल असा एकूण 98 हजार 205 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस जवान अमोल काळे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास एम. एम. झनकर हे करीत आहेत.