जळोची- बारामती उपविभागातील अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात तीन महिन्यांत सहा पोलीस ठाण्यांत 423 गुन्हे दाखल आहेत. यात कारवाईत 703 आरोपींना गजाआड केले आहे. 1 कोटी 32 लाख 4 हजार 407 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांची चकमदार कामगिरी जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
टाळेबंदीच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभागातील पोलिसांनी दि. 23 मार्च ते 28 जुलै या तीन महिन्यांच्या काळात बारामती कार्यक्षेत्रात येणाऱ्या बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण या 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गोपनीय माहिती मिळवून जुगार, दारू, गुटखा, गांजासह कत्तलखाने, गौण खनिजे आदी अवैध व्यवसायांवर धडक कारवाईचा आसूड ओढला आहे. यात जवळपास 703 जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 32 लाख 4 हजार 407 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात टाळेबंदीदरम्यान तब्बल 214 अवैध दारूधंदे तर 28 ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डयावर छापा टाकून 461 जणांवर कारवाई केली आहे. दोन्ही कारवाईत 26 लाख 25 हजार 695 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशीच कारवाई वालचंदनगर, इंदापूर व भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करून 148 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 24 हजार 604 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासह उपविभागात गांजा, कत्तलखाने या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत.
15 गावठी कट्टे जप्त
उपविभागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टाळेबंदीत गुन्हेगारीशी संबंधित असणाऱ्यांची गोपनीय माहिती घेऊन टाळेबंदीदरम्यान उपविभागातून 15 गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.