पुणे – बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा खास विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. पुणे हे ऐतिहासिक शहर असून राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. हे शहर शिक्षणाचे माहेरघर असून यादृष्टीने हे “पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते. येथील पायाभूत सुविधांचा विकास पाहता काही वर्षांपूर्वी वास्तव्याच्या दृष्टीने हे अतिशय योग्य शहर मानले जात असे.
परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये बदल झाला असून नागरी सुविधांमध्ये प्रचंड त्रुटी आढळून येत आहेत, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. वीज, पाणी, कचऱ्याचे नियोजन, अंतर्गत रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, दवाखाने यांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण, फुटपाथ याखेरीज रस्ते सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.