पिंपरी, दि. 28 – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात बदल्यांची मालिका सुरु आहे. निगडी पोलीस ठाण्यातील नऊ कर्मचाऱ्यांना हिंजवडी वाहतूक विभागात संलग्न करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 15 नोव्हेंबर रोजी वाकड, निगडी, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर छापे मारले. त्यानंतर या पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मालिका सुरु झाली. निगडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षात संलग्न केले. चार कर्मचारी निलंबित केले. वाकडचे दोन अधिकाऱ्यांसह 13 जणांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. देहूरोडच्या एका सहायक निरीक्षकासह पाच जणांना बावधन वाहतूक विभागात पाठवण्यात आले.
या कारवायानंतर आयुक्तांनी निगडी पोलीस ठाण्यातील आणखी नऊ कर्मचाऱ्यांना हिंजवडी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय बबन शिंदे, सुधाकर तुकाराम आवताडे, पोलीस नाईक शंकर भागुजी बांगर, सोमनाथ रामदास दिवटे, विजय विठ्ठलराव बोडके, भूपेंद्र खंडू चौधरी, विनोद तान्हाजी व्होनमाने, तुषार पांडुरंग गेंगजे, राहुल बाबूराव गायकवाड यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय कारणास्तव संलग्न करण्यात आले आहे.