पुणे – गेल्या दहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात मतदारांच्या संख्येत यंदा एकूण 1 लाख 21 हजार 763 इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यातून ही माहिती समोर आली आहे. अंतिम मतदार यादी नागरिकांना पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध देण्यात आली आहे. नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत तेथे आणि ऑनलाइनदेखील खात्री करता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.
दि. 9 डिसेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये 1 जानेवारी 2024 पर्यंत किंवा त्याच्या आधी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. यात मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये/ छायाचित्रामध्ये दुरुस्ती, रहिवाशाचे स्थलांतरण (विधानसभा अंतर्गत/ बाहेरील), मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकित करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी करण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
तर 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, मतदार संख्या वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांत विविध उपक्रम राबवण्यासह सोशल मीडियाद्वारेही जागृती केली. त्या उपक्रमांना नागरिकांनीही प्रतिसाद दिल्याने मतदारसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
मतदारसंख्या…
पुरुष मतदार : 42 लाख 25,918
गतवर्षीच्या तुलनेत वाढ : 59 हजार 653
महिला मतदार : 38 लाख 46,741
गतवर्षीच्या तुलनेत वाढ : 62 हजार 81
तृतीयपंथी मतदार : 524
गतवर्षीची संख्या : 495 दर हजार
पुरुषांमागे महिला मतदार : 910
युवा मतदारांची संख्या वाढली
1. गतवर्षी पुणे जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदार संख्या 79 हजार 362 होती. लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी 0.67 टक्के होती. यंदा याच वयोगटातील मतदार संख्या 3 लाख 71 हजार 3 आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ती 3.13 टक्के आहे.
2. तर 20-29 वयोगटातील मतदार संख्या 13 लाख 63 हजार 624 वरून 28 लाख 27 हजार 376 झाली आहे. या वयोगटातील मतदारांच्या टक्केवारी 11.51 वरून 23.86 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.