पुणे – जगभरासह भारतामध्ये देखील कोरोना संकटाचे काळे ढग दाटून आले आहेत. या संकटसमयी गरजवंतांना मदतीचा हात देऊन अनेक संस्था माणुसकीचे दर्शन घडवताना दिसत आहेत. अशीच मदत श्री वीरशैव पट्टशाली लिंगायत कोष्टी समाज विकास संस्था, पुणे यांनी ससून रुग्णालयाला करत सामाजिक भान जपले आहे.
समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या विविध सेवाभावी संस्थांना श्री वीरशैव पट्टशाली लिंगायत कोष्टी समाज विकास संस्था, पुणे यांच्यामार्फत दरवर्षी ठराविक रक्कम देणगी म्हणून देण्यात येते. मात्र यंदा कोरोना विषाणू महासाथीच्या पार्श्वभूमीवर या संकटाशी दोन हात करणाऱ्या सरकारी अथवा खासगी संस्थेला ही देणगी देण्यात यावी असा निर्णय संस्थेच्या कार्यकारी सदस्यांमध्ये झाला.
यानंतर ससून रुग्णालयाशी संपर्क साधला असता येथे शिशु विभागात वॉशिंग मशीनची त्वरित गरज असल्याचे समजले. यानंतर संस्थेच्या कार्यकारी सदस्यांनी याबाबतची चर्चा करत शुक्रवार (दि. ०९/१०/२०२०) रोजी ससून रुग्णालयाच्या प्रतिनिधींकडे वॉशिंग मशीन सोपवली.
यावेळी, ससुन रुग्णालय व बी जे वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. मुरलीधर तांबे आणि ससुनच्या पेडियाट्रिक्स विभागाच्या प्रमुख डाॅ.आरती किनीकर यांनी उत्सुकता दाखवुन संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि संस्थेने दिलेल्या या देणगी बद्दल विशेष आभार मानल्याची माहिती संस्थेच्या तमन्ना बदोले यांनी दिली
यावेळी संस्थेचे कार्यकारी सदस्य तम्मन्ना बदोले, श्री.बसवराज अजगुंडे, श्री.रविंद्र कल्याणी व श्री नितिन मेणसे उपस्थित होते.