परभणी – चांगलं रूग्णालय म्हणून आम्ही नांदेडला गेलो होतो पण आमची निराशा झाली. नांदेडमध्ये त्यांना हवे तसे योग्य उपचार मिळाले नाहीत आणि तिथेच त्यांची प्रकृती ढासाळली. त्यांना नांदेडला नेल्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागली. आमचा भाऊ आम्ही गमावला, अशा भावना व्यक्त करत आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी नांदेड येथील सरकारी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.
आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे (रा.उमरा काशीद, ता. पालम, जिल्हा. परभणी) हे त्रिपुरामध्ये अर्थ विभागात सचिव पदावर कार्यरत होते. शिंदे हे 15 दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. त्यांची थोडीशी तब्बेत बिघडली होती. सर्दी, ताप असा त्रास होत होता. त्यानंतर लगेच त्यांना नांदेड येथील गुरू गोविंदसिंग शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांची तब्बेत
सुधारण्याऐवजी जास्तच बिघडली.
त्यानंतर त्यांना औरंगाबादमधील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुणे येथील रुबी हाॅल रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेही त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली नाही. याच रूग्णालयात शुक्रवारी त्यांचे निधन झाले.
शिंदे यांना कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यांची दोन वेळा कोरोना तपासणी देखील करण्यात आली होती. मात्र, दोन्हीही वेळा त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. तरीही शिंदे यांचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
वडील, चार भाऊ, तीन बहिणी, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, असा शिंदे यांचा परिवार आहे. कुटूंबातील कर्तबगार व्यक्ती अचानक गेल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.