नवी दिल्ली – निवडणुकांमधील इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राचा वापर थांबवा अशी मागणी करणारी याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने दहा हजार रूपयांचा दंड केला आहे.खोट्या माहितीच्या आधारे ही याचिका केली गेली आहे असा आरोप करीत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांच्या वापरात नेमक्या काय तृटी आहेत याची कोणतीही ठोस माहिती सादर करण्यास याचिकाकर्त्याला अपयश आले असल्याने या याचिकेचा विचार करण्याचे कोणतेही सबळ कारण आम्हाला दिसत नाही असे नमूद करीत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
सी.आर. जया सुकिन यांनी ही याचिका केली होती. त्यांना स्वताला या इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राची काहीही माहिती नाही असे निरीक्षणही कोर्टाने नमूद केले आहे. या याचिकेच्या खर्चापोटी येत्या चार आठवड्यात कोर्टात दहा हजार रूपये भरावेत असा आदेशही कोर्टाने याचिकाकर्त्याला दिला आहे.