पुणे – परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोळा वर्ष फरारी असलेल्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. राहत तालीबअली सैय्यद उर्फ अलका भगवानदास शर्मा (वय ५४, रा. आनंदयोग सोसायटी, विमाननगर, मूळ रा. जागीरपुरी, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
२००५ मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अबिदअली मसुदअली सैय्यद, अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ज्ञानेश्वर जमदाडे यांनी फिर्याद दिली होती. परदेशात नोकरीच्या आमिषाने जमदाडे, त्यांचे मित्र सुरेश रक्ती, प्रज्ञावंत करमरकर यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.
त्यानंतर राहत सय्यद तिचे नाव बदलून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होती. ती विमानगर भागात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. सय्यद दररोज सकाळी फिरायला जायची. पोलिसांनी तिला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत तिने फसवणुकीचा गुन्ह््याची कबुली दिली.
सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, मीना पिंजण, रूखसाना नदाफ आदींनी ही कारवाई केली.