औंध – बाणेर येथील सर्वे नंबर 114 मधील “ग्रे स्टोन’ इमारतीच्या बांधकामावरील क्रेन लगतच्या घरावर पडून अपघात झाला. घराचा पत्रा आणि इमारतीची भिंत यामुळे क्रेन घराच्या छतात अडकल्याने या दुर्घटनेत सुदैवाने जीवीतहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. मात्र, घरामध्ये असलेली दोन लहान मुले व महिला भयभीत झाल्या. तर, यातील एक महिला भितीेने बेशुद्ध पडली.
इमारतीच्या नवव्या मजल्यावर क्रेनच्या सहाय्याने काचा बसविण्याचे काम सुरू होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान नवव्या मजल्यावरून क्रेन खाली कोसळून इमारतीलगतच्या घरावर पडली. यावेळी क्रेन पडल्यामुळे मोठा आवाज झाला. आवाजामुळे घरातील लहान मुले व महिला घाबरून बाहेर आल्या. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे एक महिला बेशुद्ध झाली.
इमारतीचे काम सुरू असताना वारंवार अशा प्रकारे सळई वस्तू घरांवर पडण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु, यावेळी संपूर्ण क्रेनच पडल्यामुळे येथे राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम करीत असताना सुरक्षा नियमांचे योग्य पालन करण्यात आले नाही.
योग्य काळजी घेण्यात आली नसल्याने सदर अपघात झाला असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.