नवी दिल्ली – आयकर विभागाने करचुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात विविध ठिकाणी जे छापे घातले त्यात 62 कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. आयकर विभागाने दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या भागातील 42 ठिकाणांवर हे छापे घातले.
त्यात हवालाच्या माध्यमातून झालेले पाचशे कोटींचे व्यवहारही आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले आहेत. तसेच छाप्यात जी प्रचंड रक्कम सापडली ती 62 कोटी रुपयांची रोकड दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे.
हवाला आणि बोगस बिलांचे रॅकेट चालवणारे अनेक जण या कारवाईच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांची सारी पाळेमुळे आता खणून काढली जात आहेत. करचुकवेगिरी करून जमलेल्या रकमेतून या रॅकेटमधील लोकांनी ज्या मालमत्तांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्याचाही शोध हे अधिकारी आता घेत आहेत.