मुंबई – परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आपल्याला काही जणांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. आपल्याला मारण्यासाठी एका गॅंगला दोन कोटी रुपयांची सुपारीही देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस तक्रारीत त्यांनी त्याचा तपशील सादर केला आहे. खासदार जाधव यांनी मंगळवारी नानलपेठ पोलीस ठाण्यांत जाऊन रितसर तक्रार नोंदवली आहे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रभावशाली व्यक्तीने नांदेड येथील एका टोळीला आपल्याला मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी दिली आहे अशी आपल्या खात्रीशीर माहिती 18 ऑक्टोबर रोजी मिळाली आहे.
पोलिसांनी या तक्रारीनुसार तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संजय जाधव यांनी ऑगस्ट महिन्यातच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.
जिंतूर मार्केट कमिटीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जे झुकते माप देण्यात आले त्याबद्दल त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. तथापि, त्यांच्या तक्रारींची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांनी त्यांचे मन वळवल्याने खासदार जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.