पुणे– पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द, पेरणे, कोलवडी, हडपसर आणि बावडी या पाच गावांमधील सुमारे 15.5 हेक्टर भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच ही प्रकिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम निधीची वाट न पाहता त्वरीत सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 575 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादना संदर्भात रेल्वे विभागाकडून प्रस्ताव दाखल झाले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून भूसंपादन प्रकिया सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी सुरू केली आहे. भूसंपादनासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यामध्ये किती घरे आहेत, शेतात पिके कोणती आहेत. त्यांचे बाजारमूल्य किती आहे, याची माहिती जमा केली जाणार आहे. त्याचबरोबर जमिन मोजणीसाठी भूमि अभिलेख विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.