अन्न व औषध प्रशासनाची पुणे मार्केटयार्डात छापेमारी

36 लाख रुपयांचा खाद्य तेलसाठा जप्त

पुणे – अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्केटयार्ड येथील 2 खाद्यतेल उत्पादक आणि विक्री करणाऱ्या उत्पादकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रशासनाने 35 लाख 83 हजार 101 रुपयांचा माल जप्त केला असून, संबंधित व्यावसायिकांना “उत्पादन बंदीचे’ आदेश दिले आहेत.

 

मार्केटयार्ड येथील व्यावसायिकांतर्फे खाद्यतेलाबाबत भेसळ केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनातर्फे परिसरातील चिमणलाल गोविंददास तसेच प्राज ट्रेडर्स या दोन ठिकाणी छापा टाकला. ही कारवाई प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये विभागाचे अधिकारी एस.ई.देसाई, अन्नसुरक्षा अधिकारी एन. बी. खोसे, ए.एस.गवते आणि आर. एम. खंडागळे यांनी चिमणलाल गोविंदलाल यांच्या गोदामात, तर यांनी प्राज ट्रेडर्स याठिकाणी अन्नसुरक्षा अधिकारी एन. बी. खोसे, खेमा सोनकांबळे आणि स्वाती म्हस्के यांनी कारवाई केली.

 

यापैकी चिमणलाल गोविंदलाल यांच्या गोदामात खाद्यतेलाचे प्रक्रिया आणि पॅकेजिंग केले जात आहे. मात्र, त्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी कोणतीही प्रयोगशाळा अथवा तज्ज्ञ व्यक्ती नाही. तसेच उत्पादकाने विभागाकडून उत्पादनाची तपासणी केली नसल्याचे आढळून आले. तसेच याठिकाणी खाद्यतेलात भेसळ केली जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

ही बाब लक्षात घेत, दुकानातील 10,054.45 किलोचे सूर्यफुलाचे तसेच 118.4 किलो शेंगदाणा तेल जप्त केले. याची एकूण किंमत 22 लाख 33 हजार 610 इतकी आहे. तर प्राज ट्रेडर्स येथील कारवाईत, चार खाद्यतेलाचे नमुने आणि 13 लाख 49 हजार 491 रूपयाचा माल जप्त केला आहे. याठिकाणी खाद्यतेलाच्या पॅकेजिंगच्या रिपॅकेजिंगसाठी जुने डबे वापरले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.