- करोनामुळे एकही मृत्यू नाही
पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 20) 11 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नवी सांगवी येथील करोनामुक्त झालेल्या 45 वर्षीय पुरुषाला आज घरी सोडण्यात आले. गेल्या आठवडाभरात रुग्णालयामध्ये करोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही.
पिंपळे गुरव-काशिदनगर, हडपसर, मांजरी, न्हावर, काळेवाडी, तळेगाव, औंध येथील 11 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये 5 महिला आणि 6 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. ऑक्टोंबर महिन्यात गेल्या 20 दिवसांमध्ये केवळ 5 जणांचाच करोनाने मृत्यू झाला आहे.
ऑक्टोंबर महिन्यातील करोनाचा पाचवा बळी 12 ऑक्टोंबरला गेला. त्यानंतर मात्र, गेल्या आठवडाभरात करोनाने एकही मृत्यू झालेला नाही. ही बाब दिलासाजनक आहे. दरम्यान, रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 140 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून 464 रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 52 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.