मुंबई – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषने आज अभिनेत्री रिचा चढ्ढाची बिनशर्त माफी मागितली.
रिचा चढ्ढाची बिनशर्त माफी मागण्यास आपण तयार असल्याचे पायलने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. पायलची माफी स्वीकारण्यास तयार असल्याचे रिचा चढ्ढाच्या वकिलांनीही न्यायालयात सांगितले.
अनुराग कश्यपविरोधात आरोप करत असताना पायल घोषने रिचा चढ्ढा आणि अन्य दोन अभिनेत्रींनाही विनाकारण वादामध्ये ओढले होते.
आपल्याबाबत अत्यंत खोटी, बिनबुडाची, असभ्य अणि बदनामीकारक शेरेबाजी केल्याबद्दल रिचा चढ्ढाने पायल घोषविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता.
मात्र ही वक्तव्ये अनवधानाने केली गेली होती. पायल रिचा चढ्ढाची फॅन आहे आणि तिचा आदर करते. वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास पायल तयार आहे आणि या वक्तव्यांबाबत रिचा चढ्ढाची माफी मागण्यासही तयार आहे, असे पायलच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
चित्रपट विश्लेषक कमाल खान याने सोशल मिडीयावर केलेल्या काही पोस्टवरून रिचा चढ्ढाने त्याच्याविरोधातही बदनामीचा खटला दाखल केला आहे. आपण रिचाविरोधात सोशल मिडीयावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी कमाल खानने न्यायालयात दिली आहे.