पुणे – महापालिका अतिक्रमण विभागाकडून टेम्पो, रिक्षा, कारमधून विनापरवाना भाजी, फळे, चपला-बूट, खेळणी आदी गोष्टी विकणाऱ्या व्यावसायिकांवर ‘जॅमर’ कारवाई करत दंड वसूल केला.
लॉकडाऊन काळात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तब्बल 37 व्यावसायिक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
करोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, त्याला नागरिकांनीच केराची टोपली दाखविल्याचे दिसते. या व्यावसायिकांकडून वस्तू विकत घेतल्यानेच त्यांचे फावत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.
परिणामी गल्लोगल्लीत तीनचाकी, चारचाकींमध्ये व्यावसायिक बेकायदेशीररित्या व्यवसाय करतात. वस्तू विकत घेण्यास कमीतकमी 50 ते जास्तीत जास्त 100 च्या वर नागरिकांची गर्दी प्रत्येक व्यावसायिकाच्या गाडीवर होते. अशी गर्दी धोक्याचे असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.