- नव्या 557 रुग्णांची भर; मृतांची संख्या 1879 वर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या रुग्णसंख्येने आजही दिलासा दिला. गेल्या 24 तासांत नव्या 557 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 80 हजार 480 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 20 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने मृतांचा आकडा 1879 पर्यंत पोहोचला आहे.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार 557 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शहरातील 544, तर शहराबाहेरील 13 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 13 जण शहरातील असून, 7 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1361 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 518 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूच्या आकड्याने 1879 ची संख्या गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील चऱ्होली, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपरी, पिंपळे निलख, रावेत, चिखली, दापोडी, पिंपळे सौदागर येथील 13 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील सहकारनगर पुणे, जुन्नर, खडकवासला, आंबेगाव, विश्रांतवाडी येथील 7 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 68 हजार 453 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 5 हजार 218 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 691 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1887 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 3 हजार 170 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 3 हजार 434 आणि शहराबाहेरील 589 जणांवर पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.