पुणे – राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विज्ञान व गणित या विषयांच्या शिक्षकांसाठी “मैत्री करू या विज्ञान गणिताशी’ यावर ऑनलाइन कार्यशाळा घेण्यास शनिवारपासून (दि.3) सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, आयसर यांच्या वतीने शिक्षकांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थी व शिक्षक यांना परिसरात उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान व गणिताच्या विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखविणे व वर्गामध्ये विज्ञानाचे हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करणे, गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना सहज व सोप्या भाषेत समजावून घेण्यास मदत व्हावी या दृष्टीनेच ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.
विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजित सर्व कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या व दिलेले सर्व उपक्रम योग्य रितीने पूर्ण करणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक यांनाही कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे.
उष्णतेच्या गमती-जमती, चुंबकाचे गुणधर्म व उपयोग, चुंबकत्व आणि विद्युतधारा याचा परस्पर संबंध, खेळ प्रकाशाचा, ध्वनी निर्मिती व गुणधर्म, बल व दाव, आम्ल, आम्लारी व क्षार, रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार, मानवी शरीर, परिमिती, क्षेत्रफळ व घनफळ आदी विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.