मंचर – नाभिक समाजातील मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यांनी पारंपरिक व्यवसायात बदल करून आधुनिक व्यवसायाची कास धरावी, असे आवाहन शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केले.
अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या नाभिक समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार आंबेगाव तालुका सलून व्यावसायिक पार्लर असोसिएशनच्या वतीने देवेंद्र शहा यांच्या हस्ते झाला. पराग डेअरीतील मंदिरात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आंबेगाव तालुका सलून, ब्युटी पार्लर असोसिएशनचे आंबेगाव तालुका अध्यक्ष गणपतराव क्षीरसागर, उपाध्यक्ष रत्नाकर कोऱ्हाळे, सचिव सुनील कोऱ्हाळे, अनिल बिडवे, मनोज शिंदे यांसह सलून व्यावसायिक उपस्थित होते. करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, असे सांगून शहा म्हणाले, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात कोविड सेंटर सुरू करून करोनाग्रस्तांना दिलासा मिळाला. उपस्थितांचे स्वागत रत्नाकर कोऱ्हाळे, सूत्रसंचालन गणपतराव क्षीरसागर यांनी केले.