जुन्नर (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागांतील एक छोटेसे गांव, बोतार्डे. येथील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील ऋतुजा प्रकाश आमले ही दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.६० टक्के मार्क मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. बोतार्डे (आमलेवाडी) गावचे जुन्नरपासूनचे अंतर १० किलोमीटर असून शाळा व अभ्यासिकेकरिता ऋतुजाला सकाळी ६.३० ला घर सोडावे लागायचे. मग काही अंतरावर असलेल्या बस स्टॉपवर सातची बस पकडण्यासाठीची धावपळ. तेथून अभ्यासिका व शाळा करून थेट सायंकाळी ७ ला परत घरी येणे, हाच ऋतुजाचा दिनक्रम. आल्यावर घरातील कामे, आईला मदत, भावाला अभ्यासात मदत व गोठ्यातील आवराआवर. मग उरलेल्या वेळेत अभ्यास करणाऱ्या ह्या मुलीचे स्वप्न आहे डॉक्टर बनायचं.
आमदार अतुल बेनके यांनी स्वीकारले पालकत्व-
ऋतुजावर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आमदार अतुल बेनके यांनी ऋतुजाच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. पुस्तके देऊन तिला पेढा भरवला. “भविष्यात तुला शिक्षणासाठी कसलीही अडचण येणार नाही, ती माझी मुलगीचं आहेस” असा शब्द आमदारांनी ऋतुजाच्या पालकांना दिला आहे. यावेळी ऋतुजाने अण्णासाहेब आवटे शाळेतील संबंधित शिक्षक, विशेष अभ्यासिकेचे शिक्षक यांचे आभार मानले.
तसेच केएमएम (कीप मुविंग मुव्हमेंट) या संस्थेला मनःपूर्वक धन्यवाद दिले. केएमएम ह्या संस्थेतील स्वयंसेवक जुन्नर तालुक्यातील दहावीच्या सुमारे १००० विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून मोफत मार्गदर्शन करत असल्याची माहिती आमदार बेनके यांनी यावेळी दिली. ह्या संस्थेकडून मोठी स्वप्न पहा आणि न डगमगता पुढे चला, हा मंत्र मिळाल्याचे ऋतुजाने यावेळी सांगितले.
तालुक्यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्यावतीने शिष्यवृत्ती दिली जात असून तालुक्यातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांनीही त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बेनके यांनी यावेळी केले. याप्रसंगी उद्योजक धनराज खोत, राहुल गावडे, नगरसेवक सुनील ढोबळे, सचिन गिरी व ग्रामस्थ उपस्थित होते.