वॉशिंग्टन: दक्षिण चीन समुद्र हा काही चीनचा सागरी प्रदेश नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा म्हटले असून दक्षिण चीन समुद्राच्या वादावर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच तोडगा काढला जावा, अशी अमेरिकेची स्वच्छ भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चीन उघडपणे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत असून मुक्त राष्ट्रे त्यावर काहीही करत नाहीत. चीनची कम्युनिस्ट पार्टी सहजपणे आणखी प्रदेश ताब्यात घेते असे इतिहास सांगतो, असेही पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.
दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा बेकायदेशीर असल्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिल्यानंतर पॉम्पेओ यांनी हे निवेदन दिले आहे.
वादग्रस्त बेटांना आंतरराष्ट्रीय कायदा गैरलागू असल्याचा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या दावा संयुक्त राष्ट्रातील ऑस्ट्रेलियाच्या कायम प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात फेटाळून लावला होता. चीनचे कोणतेही दावे 1982 च्या सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाशी विसंगत आहेत.
चिनी कम्युनिस्ट पक्षाने केलेले सागरी दावे बेसलाइन, सागरी झोन आणि भागांचे वर्गीकरणाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही नियमांना धरून नाहीत, असे ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटले आहे.