दोन दिवसांपूर्वी निधन झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह
तीन दिवस सुपा शहर बंद
सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील सुपा शहरात दोन दिवसांपुर्वी निधन झालेल्या 56 वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह असल्याचे गुरुवारी सकाळी निष्पन्न झाल्याने सुपा बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. सुप्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाल्याने तातडीने पुढील तीन दिवस सुपा गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुपा येथील 56 वर्षीय महिलेचे मंगळवारी निधन झाले. ती आजारी असल्याने तिला सुपा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. गुरुवारी सकाळी तिचा तपासणी अहवाल आल्यावर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. निधन झालेल्या महिलेचे नातेवाईक तिच्या अंतविधिला उपस्थित होते. त्यामुळे हे नातेवाईक व ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची आता या सर्वांची तपासणी केली जात आहे. तसेच हे रुग्णालय सील करण्यात आले आहे.
सुप्यात पहिल्यांदा स्थानिक रहिवासी करोना बाधित सापडल्याने चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे.
सुप्यात सर्व नियम, आदेश धाब्यावर बसुन सर्व प्रकारचे व्यावसाय चालू होते. आज सुपा शहरात स्थानिक रुग्ण सापडल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, मंडलाअधिकारी साठे, रुईछत्रपती आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.आश्विनी गुंजाळ, कामगार तलाठी बाळासाहेब कुसमोडे, ग्रामविकास अधिकारी अशोक नागवडे यांनी ताबडतोब ते खासगी रुग्णालय व तो परिसर सील केली. तहसिलदार देवरे यांनी ध्वनीक्षेपकावरून पुढील तीन दिवस सुपा शहर बंद राहील, अशी घोषणा केली व ताबडतोब सुपा बाजारपेठ बंद झाली आहे.