सासवड -शहरातील करोनाची संख्या गेल्या चार ते पाच दिवसांत झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या थोपविण्यासाठी सासवड नगरपालिकेने मंगळवार (दि. 23) ते शुक्रवार (दि.26) या कालावधीत शहर संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. सासवड शहरात सध्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही 15 वर पोहोचली आहे, यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 4 घरी सोडण्यात आले असून 10 रुग्णांचे पुणे येथे उपचार सुरू आहेत.
शहरात मंगळवारी (दि.26) चौघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात एक नगरसेविका, तिचा पती, दुसऱ्या एका नगरसेविकेच्या मुलगा व एक बॅंक कर्मचारी असून तो सासवड येथून रोज पुणे येथे कामानिमित्त प्रवास करत होता, अशा चौघांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, राजकीय व्यक्ती असेल्या रुग्णांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क नागरिकांची संख्याही मोठी असणार आहे. हे लक्षात घेता सासवड नगरपालिकेकडून संपूर्ण सासवड शहरात जनता कर्फ्यू लागू केला आहे. पुढील चार दिवसाच्या जनता कर्फ्यू कालावधीत सासवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त दवाखाने, टेस्टिंग लॅब, कृषी साहित्य विक्रीची दुकाने, औषध दुकाने, बॅंका, पतसंस्था नगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळेतच खुली राहतील. दूध संकलन केंद्रात फक्त दूध विक्री केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.सासवड शहरातील उपविभीगीय कार्यालय ते कोडीत नाका, जयप्रकाश चौक, म्हेत्रे आळी हा परिसर मिनी कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या ठिकाणी ये-जा करण्यास मनाई आहे.
सासवड शहरात दिवसेंदिवस करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारण्यासाठीच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे तसेच नगरपालिकेच्या वतीने केल्या गेलेल्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
– विनोद जळक, मुख्याधिकारी, सासवड