बेल्हे – कल्याण -नगर महामार्गावर गुंजाळवाडी फाटा (ता. जुन्नर) येथे मंगळवार (दि.16) रात्री जीप व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत. भरधाव वाहनांनी धडक दिल्यानंतर कार जळून खाक झाली आहे. यात कारमधील जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
याबाबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण -नगर महामार्गावर गुंजावळवाडी येथे बेल्हेकडून पुण्याच्या दिशेने कार जात होती. तर जीप आळेफाट्यावरून नगरच्या दिशेने जात होती. या दोन्ही वाहनांचा वेग जादा होता. यावेळी या वाहनांची समोरसमोर धडक बसल्यानंतर कारने जागीच पेट घेतला. यात अवघ्या अर्धा तासात कार जळून खाक झाली. कारमधून प्रवास करणारे रोहिणी शिंदे (वय 45), चंद्रकला डोके (वय 45), गणेश टेमकर (वय 26) (सर्व रा. बेल्हे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
धडक दिलेल्या जीपमधील प्रवाशांची माहिती मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. ते जादा प्रमाणात भाजल्याने जखमींना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा पुणे येथे हलवण्यात आले आहे.