मुंबई – मुंबईत शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक शेट्ये असे या 25 वर्षीय युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
श्रीकांत शेट्ये हे चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग 155 चे नगरसेवक आहेत. चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत अभिषेक शेट्ये राहायचा. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपले होते. त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
बराच वेळ होऊनदेखील तो उठला नसल्याने त्याचा भाऊ अभिषेकला खोलीत बघायला गेला. तेव्हा तो त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तत्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले. अभिषेकने मृत्यू का केला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.