मियामी – जगाच्या विविध भागातील क्रुझ जहाजांवरील सुमारे 42 हजार कर्मचारी अजून या समुद्रात जहाजांमध्येच अडकून पडले आहेत, अशी माहिती मियामी हेरॉल्डच्या रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. गेले तीन महिने क्रुझ पर्यटन बंद आहे.
या जहाजांवरील कर्मचाऱ्यांना करोनाच्या कारणांमुळे क्रुझच्या बाहेर येऊ देण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे. त्यामुळे हे कर्मचारी तेथेच अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांना करोनाही झाला आहे.
अमेरिकेने त्यांच्या सागरी हद्दीत येत्या 24 जुलैपर्यंत क्रुझ जहाजांना बंदी घातली आहे. तसेच युरोपिय देशांचीही अनेक जहाज अजून समुद्रातच अडकवून ठेवण्यात आली आहे. या अडकलेल्या जहाजांवरील कर्मचाऱ्यांचा अंदाज घेतला तर किमान 42 हजार जण तेथे अडकून पडले आहेत. आता अगदी अलीकडच्या काळात त्यातील काही जणांना त्यांच्या देशात जाण्याची अनुमती देण्यात आली आहे.