पंजाब: बॉलिवूड अभिनेता रतन चोप्रा यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाना त्रस्त होते. अखेर पंजाबमधील मलेर कोटला येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “मोम की गुडियॉं’ या चित्रपटामधून ते घराघरात पोहोचले होते. रतन चोप्रा यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिली. आर्थिक चणचण असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करता न आल्याचे सांगण्यात येत आहे.
रतन चोप्रा यांना जानेवारी 2020 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी काही बॉलिवूड कलाकारांकडे आर्थिक मदतही मागितली होती. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. यातच उपचाराअभावी त्यांचे निधन झाले.
दरम्यान, रतन चोप्रा यांनी लग्न केले नव्हते. मात्र त्यांनी अनिता या मुलीला दत्तक घेतले होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात केवळ अनिताच आहे. रतन चोप्रा यांनी 1972 मध्ये “मोम की गुडियॉं’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ते त्याकाळी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होते.