वॉशिंग्टन: एका कृष्णवर्णीय कैद्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत सुरू झालेल्या दंगली आणि निदर्शने अजून शमलेल्या नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या अध्यक्ष ट्रम्प यांनी ही निदर्शने आता थांबली नाहीत तर लष्कराला पाचारण करण्याचा इशारा दिला आहे. व्हाईटहाउसच्या रोझ गार्डनमधून सोमवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी हा इशारा दिला.
ही निदर्शने, हिंसक प्रकार आणि लुटालूट थांबवण्याची जबाबदारी प्रांतिक सरकारांची आहे. त्यांना जी झेपत नसेल तर मी येथून हजारो सशस्त्र सैनिक त्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवीन, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेत गेले आठवडाभर ही हिंसक निदर्शने सुरू असून त्यात अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधात तीव्र नाराजी व्यक्त करून ट्रम्प यांनी म्हटले आहे की मी आज प्रत्येक राज्याच्या गव्हर्नरांना नॅशनल गार्ड तैनात करण्याची सूचना केली आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी आता मनुष्यबळाचाच वापर करा, असे मी त्यांना सांगितले आहे असे ते म्हणाले. जर राज्य किंवा शहर प्रशासनांनी त्या अनुषंगाने उपाययोजना केली नाही तर मला मिलिटरी पाठवावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
निदर्शने शांततेने व्हावीत अशी अपेक्षा होती पण आज ठिकठिकाणी लुटालूट, जाळपोळ आणि गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये सुरू आहेत ती खपवून घेतली जाणार नाहीत असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. फ्लॉयड मृत्यू प्रकरणात योग्य तो न्याय केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पण देशाची कायदा व्यवस्था अबाधित राखण्याची शपथ मी घेतली आहे आणि आता मला तेच करावे लागणार आहे. माझे प्रशासन त्यासाठी सक्षम आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या दंगली थांबवण्यासाठी जी पूर्वतयारी करायची आहे ती आम्ही पूर्ण केली असल्याचा निर्णायक इशाराही त्यांनी या भाषणात दिला.