रेडा – इंदापूर शहरातील नेताजी नगर परिसरात शुभमभैय्या पवार मित्र परिवार व शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, गटनेते कैलास कदम, डॉ. दत्तात्रय कांबळे, गणपतराव पवार, जाकीर मोमीन यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
यामध्ये एन 95 मास्क, सॅनिटायझर बॉटल, एनर्जी ड्रिंक व प्रमाणपत्र यांचा समावेश होता. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. यामध्ये इसीजी तपासणी, शुगर, थर्मल टेस्ट इत्यादी तपासणीचा समावेश होता. रक्तदान शिबिरासाठी सोलापूर ब्लड बॅंकेचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, गणेश महाजन, इंदापूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे, प्रा. अमित घाडगे, सोमनाथ गवळी यांनी भेट दिली.