बुध – खटाव तालुक्यातील चिंचणी येथे चेंबुर (मुंबई) येथून आलेल्या युवकाला करोनाची बाधा झाल्यानंतर चिंचणीकरांची झोप उडाली असतानाच तालुक्यातीलच मांजरवाडी येथील सासू व सुनेचा अहवालदेखील करोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, चिंचणी येथील करोनाबाधित युवकाच्या संपर्कातील आठ जणांना सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
उत्तर खटाव, गारवडी, मांजरवाडी, चिंचणी गावात करोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील इतर गावेसुद्धा हादरून गेली आहेत.पोलादपूर – पंढरपूर राज्य मार्गावर घाटापासून 1 किलोमीटर अंतरावर चिंचणी हे गाव असून पाच ते सहा वस्त्या आहेत. या गावाची 983 लोकसंख्या आहे. 20 मे रोजी चेंबुर (मुंबई) येथून एका खासगी चार चाकी वाहनाने सात जण शिरवळपर्यंत आले. त्यांच्या पाठीमागे त्याच गावातील चौघे मोटारसायकलवरून येत होती. शिरवळमध्ये त्याची भेट झाली. त्यानंतर त्या मोटारसायकलवरील दोघेजण त्या गाडीत बसून सर्वजण चिंचणी येथे आली. चिंचणी येथे आल्यानंतर त्यांना होमक्वारंटाइन करण्यात आले. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांपैकी एका 21 वर्षाच्या युवकाला 21 रोजी ताप येवू लागल्याने सातारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
शनिवारी रात्री त्या युवकाचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्यामुळे चिंचणीकरांची झोप उडाली. प्रशासनाला माहिती मिळताच डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. माधुरी पवार, डॉ. पराग रणदिवे, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अमोल जाधव, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी चिंचणी येथे भेट देवून पाहणी केली. तसेच युवकाच्या संपर्कातील आलेल्या आठ जणांना सातारा येथे जिल्ह्या रूग्णालयात पाठविण्यात आले. तर दोघांना क्वारंटाइन केले.
रविवारी सकाळी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ. युनूस शेख, सपोनि विश्वजीत घोडके, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अजय जाधव, ग्रामसेवक छ. घाडगे, पोलीस पाटील गणेश शिपटे, सरपंच संगीता सुनील घोरपडे यांनी गावात भेट देवून गाव संपूर्णपणे सील केले.