मंचर – अवसरी बुद्रुकयेथे सोमवार (दि. 25) ते सोमवार (दि.1) पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय प्रशासन, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. निरगुडसर आणि जवळे गावात कारोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुका हा मागील आठवड्यात ग्रीन झोनमध्ये होता; परंतु शहरीभागातून ग्रामीण भागाकडे नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आलेले सर्व नागरिक हे बहुतांशी प्रमाणात मुंबई, पुणे या ठिकाणाहून आलेले असून, सर्व नागरिक रेड झोनमधून आल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे शहरातील व बाहेर गावातील आलेल्या नागरिकांचे अवसरी बुद्रुक गावात क्वारंटाइन करण्यात आले आहे, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यापारी व ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा म्हणून कडकडीत बंद पाळला असून, करोनाला रोखण्यासाठी गावात येण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.