राहुरी -राहुरीत आज जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. आता करोना पार्श्वभूमीवर दुकाने सुरु केली जात असून त्यासाठी राहुरी पॅंटर्नला सरकारची मंजुरी मिळाली आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी अमिषा मित्तल, तहसीलदार फैजियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, मुख्याधिकारी निवास कुहे, देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत व व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख व प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर करोना लॉकडाऊनच्या काळात राहूरी तालुक्यात काही व्यवसाय ठराविक दिवशी चालू करण्यासंदर्भात सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे व्यवसाय हे राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, राहुरी फॅक्टरी, देवळाली, सोनगाव सात्रळ, वांबोरी या सहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर चालू करता येतील. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरु झाली. सकाळी 8 ते दुपारी तीन वाजेपर्यंत यावेळेत दुकाने चालू रहातील. राहुरी शहरासाठी लॉकडाऊनच्या काळातील गुरूवार हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून राहील.त्यानुसार आज जनता कफ्यू पाळला गेला. आज औषधे दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकानेबंद होती.
दुकानांसाठी वार ठरवून दिले आहेत. शनिवारी – चप्पल, शूज दुकाने, जन.स्टोअर, कॉस्मॅटिक, चष्मा दुकाने. रविवारी – वस्तूभांडार, कूशन, फर्निचर दुकाने, गिफ्ट शॉपी, सोमवारी – इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल, मोबाईल शॉपी व मोबाईल रिपेअर दुकाने. मंगळवारी – बिल्डिंग मटेरियल मार्बल व फॅब्रिकेशन दुकाने. बुधवारी – हार्डवेअर, प्लायवूड, प्लंबिंग, स्लायडिंग इ. दुकाने. गुरूवारी- जनता कर्फ्यू (सर्व दुकाने बंद). शुक्रवारी – कापड, रेडीमेड दुकाने, सराफ सुवर्णकार, टेलर इ दुकाने.
सर्व गावात आठवडेबाजार बंद राहतील. सर्व व्यावसायिक व दुकानातील कर्मचाऱ्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येकवेळी 300 रुपये दंड आकारला जाईल. व्यावसायिकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अन्यथा प्रत्येकवेळी 200 रुपये इतका दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी कोणीही थूंकू नये अन्यथा 500 रुपये दंड आकारला जाईल. असे आदेश काढण्यात आले आहेत.