नागपूर: नागपूर महानगरपालिकेने पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयी असलेले कोविड केअर सेंटर उभारले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे आणि एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिलेच सेंटर असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात हे पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे.
भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोविड केअर सेंटरची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासाने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली.
राधास्वामी सत्संग न्यासाने केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे.
कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.