सातारा -स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाला दिल्लीच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाकडून स्टार महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी बायोटेक्नॉलॉजीअंर्तगत एक कोटी चार लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी दिली.
मानव विकास संसाधन मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान उपक्रमाअंर्तगत ज्या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेकरता पायाभूत सुविधा व सक्षम प्राध्यापक वर्ग आहे, त्यांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. या प्रस्तावांर्तगत देशपातळीवरून 84 महाविद्यालयांनी या योजनेला प्रतिसाद दिला. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयानेसुध्दा विहित नमुन्यात प्रस्ताव पाठवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेजवळ व समन्वयक प्रा. निनाद कदम यांनी सप्टेंबर 2019 मध्ये दिल्ली येथे जाऊन या प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्रस्तावात पात्र ठरल्यानंतर अनुदानाच्या खर्चाचा प्रस्ताव मागवण्यात आला. आणि स्टार मानांकनासाठी लालबहाद्दर शास्त्री महाविद्यालयाची निवड झाल्याची घोषणा मानव संसाधन मंत्रालयाने केल्याची माहिती प्राचार्य शेजवळ यांनी दिली. या शैक्षणिक वर्षात असे स्टार मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठाअंर्तगत एलबीएस कॉलेज एकमेव आहे.
दर तीन वर्षानी मानव संसाधन मंत्रालयाकडून हे प्रस्ताव मागवले जातात. बॉटनी, झुऑलॉजी, केमेस्ट्री, स्टॅटॅस्टिक्स व बायोटेक्नॉलॉजी या पाच विभागांचे अद्ययावतीकरण, सूसूत्रीकरण व अनुषांगिक सुविधांच्या सक्षमीकरणासाठी एक कोटी चार लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. विज्ञान शाखेत नवीन उपक्रम सुरू करणे, अध्ययन व अध्यापन यांचा दर्जा सुधारणे, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देणे आदी उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. एलबीएस कॉलेजने नॅकचे ए मानांकन 3.15 सीजीपीए गुणांसह प्राप्त केले आहे.
या प्रस्ताव सादरीकरणांमध्ये प्राचार्य डॉ. शेजवळ यांचे मार्गदर्शन, प्रा. निनाद कदम व सर्व विभागप्रमुख प्राध्यापकांच्या योगदानाचे मोठे यश आहे. महाविद्यालयात आठ विषयांत पीएचडी करण्याची सोय असून त्याचा लाभ 22 विद्यार्थी घेत आहेत. महाविद्यालयाच्या संशोधनाचे दोन पेटंट मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे व प्र- कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी प्राचार्य शेजवळ यांचे अभिनंदन केले.