रायपूर – छत्तीसगड मधील नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाले असून या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ही चकमक झाली.
नारायणपुर हा जिल्हा नक्षलप्रभावित आहे. तेथील जंगलांमध्ये आज सकाळी पोलीस पथक तपासणी करीत असताना तेथे त्यांच्यावर नक्षलवाद्यांच्या एका टोळीने हल्ला केला. तसेच तेथे आयईडीचा स्फोट घडवूनही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले त्यात ही महिला नक्षलवादी ठार झाली. तिची ओळख पटलेली नाही.
तिच्या जवळ सापडलेल्या दोन रायफली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.