- सेंद्रिय खतांचा वापर करून फुलविलेल्या भाजीपाल्यामुळे सकस आहार
कामशेत – शहरातील बंगला कॉलनीमध्ये राहणाऱ्या शिरसट कुटुंबातील सासू-सुनेने संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर करत मोठ्या कष्टाने परसबाग फुलवली आहे. परसबागेतील भाजी आठवडाभर उपयोगाला मिळते. त्यामुळे घरखर्चाला मोठा हातभार, तर लागतच आहे. त्याबरोबरच शाश्वत भाजीपल्यामुळे सकस आहार मिळत असल्याचेही समाधान मिळत आहे.
नव्वदच्या दशकात कामशेत शहरात स्थायिक झालेल्या शिरसट कुटुंबातील बेबी शिरसट या शेतकरी कुटुंबातील व शेतीची आवड असलेली गृहिणी. जुनी दहावी शिक्षण झाले असताना कुटुंबाच्या संगोपनासाठी नोकरी न करण्याचा निर्णय घेतलेल्या या मातेने सून मायासह घरालगत असलेल्या 200 ते 250 चौरस फूट जागेत सुनियोजित पद्धतीने लागवड करण्याचे ठरवले. यासाठी पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न रहाता सूनबाई मायासह इंटरनेटवर परसबागेविषयी संपूर्ण माहिती घेत पिकांची निवड केली. यामध्ये आठवडाभर लागणारा भाजीपाला घरीच पिकवण्याची किमया त्यांनी केली आहे.
विशेष बाब म्हणजे यासाठी गीर गाईचे गोमुत्र व शेणखत याचा वापर केला आहे. झाडांवर नाग अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही गोमुत्राचाच वापर करत कीड नियंत्रणात आणत कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकांशिवाय यशस्वीपणे पीक घेतले आहे.
शिरसट यांच्या परसबागेत मिरची, वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी, चवळी, कांदा पात, फ्लॉवर या भाज्यांसह रताळ्याची लागवड केलेली आहे. याच बरोबर लाकडी मांडवावर कारले, भोपळा, घोसाळे, दोडका यांचे बहरलेले वेल परिसरातील नागरिक आवर्जुन पाहात आहेत.
याच बरोबर घरातील सांडपाणी जाण्याच्या मार्गावर पुदिना, आळूच्या पानांचे उत्पादन घेतले आहे. घराच्या मागील बाजुस सेंद्रिय खतावर वाढलेले लिंबाचे झाड, कडीपत्ता नियमित जेवणाचा रस वाढवत आहे. याच ठिकाणी असलेली पेरू, पपई व डाळिंबाची प्रत्येकी दोन-दोन झाडे फळांची गरज पूर्ण करत आहेत. याबरोबरच कोरपड, नागिणीच्या पानांचा वेल जेवणानंतर उपयोगात येत आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. त्यातच हवामानातील बदल विविध रोगांना आमंत्रण देत असताना पिकांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. या सर्वांमुळे अनेक आजार जन्म घेत असताना सासू-सुनेने फुलवलेली “शेती’ सर्वांना आदर्शच घालून देणारी असल्याचे बोलले जात आहे.
सकस आहार मिळावा व रासायनिक खतांच्या दुष्परिणामांपासून सुटका व्हावी म्हणून हा प्रयत्न सर्वांनीच करावा. पुढील वर्षी परसबागेत ठिबक सिंचन करण्याचा मानस आहे.
– माया शिरसट, गृहिणी