सोमाटणे – मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावामध्ये ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन पिल्ले गुरुवारी (दि. 2) सकाळी आढळून आली. येथील शेतकरी शंकर वाघोले यांच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू असताना ऊसाच्या पाचाटाखाली वाघोले यांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. या घटनेबाबत वनविभागाला तात्काळ खबर देण्यात आली.
यानंतर वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बेबड ओहोळ बीटच्या वनरक्षक रेखा वाघमारे, वन्यजीव रक्षक दलाचे निलेश गराडे तसेच कात्रज येथील वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याच्या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर त्यांना योग्य त्या ठिकाणी सोडून दिले जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी सांगवडे गावांमध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळली होती. त्यावेळी एका मादी बिबट्याने या दोन्ही पिलांना आपल्या सोबत नेले होते. त्यामुळे आज आढळलेली दोन्ही पिल्ले तीच असू शकतात किंवा दुसरी आहेत.
याविषयी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पिल्लांबरोबर मादी बिबट्याला सुद्धा पकडून घेऊन जाण्याची आग्रही मागणी येथील ग्रामस्थ घटनास्थळी वनविभागाला करित होती. बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी होणारी गर्दी पाहून पोलीस पाटील लक्ष्मण शितोळे यांनी परंदवडी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. शिरगाव पोलीस चौकीचे राकेश पालांडे व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी करणारांना मज्जाव केला.