पुणे -व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन सराफाला पिस्तूलाच्या धाकाने 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलंबित केलेले मंगलदास बांदल यांना 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
यापूर्वी या प्रकरणात आशिष पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश पवार (वय 32, रा. मार्केटयार्ड) आणि संदेश वाडेकर या चौघांना अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगलदास बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी त्याच्यासोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्यावतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक करून बांदल याला न्यायालयात हजर केले.
त्यावेळी यापूर्वी त्यांच्यावर खंडणी, फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील व्हिडिओ क्लीप त्यांच्याकडे असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. फिर्यादीच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले.