पिंपरी – केशवनगर, चिंचवड येथे लागलेल्या आगीत 11 वाहने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी चिंचवड लिंक रोडवर केशवनगर येथे मदीना ऑटोमोबाइल व अरफान फूट स्टॉल आहे. याठिकाणी आग लागल्याची वर्दी मंगळवारी रात्री 11.18 मिनिटांनी अग्निशामक दलास मिळाली. सुरुवातीला प्राधिकरण आणि रहाटणी अग्निशामक केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
मात्र, आगीचे रौद्र स्वरूप पाहता अग्निशामक मुख्यालयातून आणखी तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीत वाहनांच्या इंधनाच्या टाकीचे स्फोट होत होते. तोपर्यंत आगीमध्ये मदीना गॅरेजमधील अकरा वाहने जळून खाक झाली होती. तसेच बाजूलाच असलेल्या अरफान फ्रूट स्टॉलमधील आठ ते दहा हातगाड्याही जळून खाक झाल्या.
या घटनास्थळाच्या बाजूलाच लाकडाचा मोठा साठा होता. त्या साठ्याने पेट घेतला असता तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या 21 जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आगीमुळे चिंचवडगाव परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर फक्त आगीच्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित ठेवून इतर ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. येथील अवैधरित्या उभारण्यात आलेल्या गोदामांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडेल, असे निवेदन स्थानिक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला यापूर्वीच दिले होते. मात्र, महापालिकेने येथील गोदामांवर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.