पिंपरी : वाहतुकीवरचा बोजा कमी व्हावा व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहरात उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. परंतु, याच उड्डाणपुलाखाली आता वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. चिंचवडला उड्डाणपुलाखाली वाहनधारकांचा बेशिस्तपणा दिसून येत असून, उड्डाणपुलाखाली वाहनांचे अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे.
चिंचवडमधील उड्डाणपूल आता हळूहळू पार्किंग स्टॅंड बनू लागले असून, बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली आहे.
चिंचवड लिंकरोडवरील उड्डाणपुलाखाली सर्रास वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्याचबरोबर छोटे व्यावसायिकही या पुलाखाली बस्तान बसवू पाहात आहेत. उड्डाणपुलाखाली बेसिस्त वाहने उभी केल्यामुळे येथील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली असून, अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.