नगर – महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य निवृत्त होणार आहेत. चिठ्ठीव्दारे या सदस्यांची नावे काढली जाणार असून, 31 जानेवारीला स्थायी समितीची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
स्थायी समिती सदस्यांच्या कार्यकाळाची मुदत 31 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे एकूण 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांच्या निवृत्तीसाठी 31 रोजी सभा बोलाविण्यात आली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाने मंजुरी घेतली आहे. या सभेत चिठ्ठी टाकून आठ सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.
स्थायी समितीत शिवसेना 6, राष्ट्रवादी 5, भाजप 3, बसप 1, कॉंग्रेस 1 असे पक्षीय संख्याबळ आहे. भाजप-आशा काळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर, शिवसेना- योगीराज गाडे, गणेश कवडे, अमोल येवले, सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, राष्ट्रवादी- अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर, कॉंग्रेस- संध्या पवार, बसप- मुदस्सर शेख हे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत. यापैकी चिठ्ठीव्दारे कोणते सदस्य निवृत्त होणार याकडे लक्ष लागले आहे.
मनपा सत्तेत भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बसपला दोन वर्षे स्थायी समिती सभापतीपद देण्याचा निर्णय झालेला आहे. पहिले एक वर्षे मुदस्सर शेख व नंतरची एक वर्षे अश्विनी जाधव या सभापती असा फॉर्म्युला बसपअंतर्गत ठरलेला आहे. मुदस्सर शेख हे विद्यमान सभापतीपदी आहेत. वर्षभराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने 31 रोजी सभेत आठ सदस्य निवृत्त होणार आहेत.
त्यात जर शेख यांच्या नावाची चिठ्ठी निघाली तर ते निवृत्त होतील. त्यानंतर नव्याने सभापती निवड केली जाईल. जर शेख यांच्या नावाची चिठ्ठी निघाली नाही तर त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर बसपच्या अश्विनी जाधव सभापतीपदाच्या दावेदार राहणार आहेत. यासाठी शेख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या निवडीत रंगत वाढणार आहे.