कुंभारगाव येथील प्रकार : मच्छिमार, शेतकऱ्यांमध्ये खळबळ
भिगवण- वन्यप्राण्यांचे मानवी वसाहतीजवळ राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बारामतीत दिसलेला बिबट्या, भिमानगर (ता. माढा) येथे आढळलेली मगर आणि आता पुन्हा कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील हद्दीत धमाळवाडी मगर दिसल्याने स्थानिक नागरिकांत खळबळ उडाली आहे.
दि.1 डिसेंबर रोजी भीमानगर (ता. माढा) येथे मच्छिमारांनी धाडसाने महाकाय मगर पकडून ती इंदापूर वनविभागाच्या ताब्यात दिली होती. परंतु तीच मगर पुन्हा एकदा उजनी जलाशय नजीकच्या भिगवणजवळील धुमाळवाडी (ता. इंदापूर) येथील परिसरातील वनविभागांमध्ये दिसल्याने मच्छीमार, पर्यटक, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी उजनी जलाशय परिसरातील कंदर (ता. करमाळा) येथील परिसरातही दोन वर्षांपूर्वी एक मगर मच्छीमारांना सापडली होती. तेव्हापासून उजनी जलाशयात मगरीचा अधिवास आहे. याला आता पुष्टी मिळाली आहे. भीमानगर येथे पकडलेली महाकाय मगर इंदापूर विभागाने ताब्यात घेऊन ती धुमाळवाडी येथे सोडण्यात आल्याची चर्चा होती. ती चर्चा आता मगरीने दर्शन दिल्याने खरी ठरली आहे. पुन्हा मगर दिसताच शेतकरी व मच्छीमारांचे मात्र धाबे दणाणले आहे.
दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास 12 फूट लांब व 150 किलो वजनाची महाकाय मगर भीमानगर येथे मच्छीमारांना आढळून आली होती. ही मगर मच्छीमारांनी इंदापूर वनविभागाच्या ताब्यात दिली होती. मगर वनविभागाने प्राणीसंग्रहालय अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी ती उजनी जलाशयजवळच धुमाळवाडी येथे सोडली, अशी चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी उमेश सल्ले, बाळू धुमाळ, निखिल धुमाळ, सुरेश कनिचे, विठ्ठल भोई, प्रदीप कनिचे आदींना ही मगर दिसताच पुन्हा एकदा उजनी जलाशय परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
अथांग भरलेल्या उजनी जलाशय परिसरात सध्या देशी-विदेशी पक्षांची मांदियाळी वाढू लागली असल्याने पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी मगर सोडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- वनविभागाचा बेजबाबदापणा
भीमानगर (ता. माढा) येथील पकडलेली मगर वनक्षेत्रामध्ये सोडल्याने नागरिकांच्या निदर्शनास आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी वीज पूरवठा होत असल्याने प्रसंगी रात्री-अपरात्री उजनी पात्रालगत विद्युत मोटारी चालू- बंद करण्यास, नदीलगतच्या शेतांत पिकाला पाणी देण्यास जावे लागते. मच्छिमारांना पहाटेच्या वेळी मासेमारीसाठी जावे लागते. मगर दिसल्याने धुमाळवाडी परिसरात शेतकरी व माच्छिमारांची पाचावर धारण बसली आहे.