मेरी जंग या 1985 मध्ये आलेल्या आणि बरीच चर्चा झालेल्या चित्रपटातून जावेद जाफरी या अभिनेत्यानेसिनेसृष्टीत पदार्पण केले. यातील “बोल बेबी बोल रॉक अँड रोल’ या गाण्यावरील त्याचे नृत्य चांगलेच गाजले. नंतरच्या काळात 100 डेजमधील त्याने साकारलेली सुनिलची व्यक्तिरेखाही गाजली. मधल्या काळात म्हणजे 1996 ते 2004 या काळात बुगी-वुगी या डान्स शोचा परीक्षक म्हणून जावेद झळकला. अलीकडील काळातील त्याचा लक्षात राहिलेला अभिनय म्हणजे धमाल आणि डबल धमालमधील विनोदी भूमिका.
जावेद जाफरी आता “कुली नंबर 1′ च्या आगामी रिमेकपटातून सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात जावेद जाफरीचीही छोटेखानी भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. 1995 मध्ये “कुली नंबर 1′ हा चित्रपट आला होता आणि त्यात गोविंदा व करिष्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
रिमेकपटात परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लिवर, शिखा तल्सानिया आदींच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. हा रिमेकपट वाशू भगनानीच्या पूजा एंटरटेन्मेंटतर्फे बनवण्यात येणार आहे.
जावेद यांना या चित्रपटात घेणार असल्याची घोषणा कंपनीच्या अधिकृत ट्विटर हॅंडवरुन करण्यात आली आहे. जावेद अलीकडेच आयुष्मान खुरानाच्या “बाला’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकला होता. आता हा रिमेकपट 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.