संकलन : लेखिका माधुरी विधाटे
आजचा रंग – करडा
सातवे रूप – कालरात्री
प्रत्यक्ष कळीकाळाला जिचे भय वाटते ती कालरात्री. वराह पुराणात तिचे रौद्र रूप वर्णिले आहे. हे देवीचे उग्र, भव्य असे प्रलंयकारी रूप आहे. देवीचा रंग काळोखासारखा काळा आहे. ती मुक्तकेशिनी आहे. गळ्यात लखलखती माळा आहे. तिच्या त्रिनेत्रातून तेजोकिरणे चमकत आहेत. मुखातून ज्वाला बाहेर पडत आहेत.
गदर्भावर बसून हातात खड्ग, कट्यार घेऊन ती दैत्यांशी युद्ध करण्यास सिद्ध आहे. साधक या देवीची कालीमाता, महाकाली, रूद्राणी, चामुंडा, दुर्गा, चंडिका, भैरवी, प्रचंडिका म्हणून उपासना करतात. अज्ञानी जीवांमधील कर्मानंतरची निद्रा घालवून ती सामर्थ्य प्रदान करते. ती दुःखाचे निराकरण करते. पाप विघ्नांचा नाश करते.