नवी दिल्ली : ट्विटरचे अकाऊंट हॅक होणे हे सर्वसामान्य किंवा सेलेब्रिटीजना काही नवीन नाही. परंतु, आता ट्विटरच्या अधिकाऱ्यांचेच अकाऊंट हॅक होण्याची घटना समोर आली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या करून त्यावर आक्षेपार्ह संदेश टाकण्यात आले आहेत. डोर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही आक्षेपार्ह संदेश जारी करण्यात आले. डोर्सी यांचे अकाऊंट हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
चकलिंग स्क्वाड हे हॅकर गटाचे नाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाझी जर्मनीला पाठिंबा देणाऱ्या संदेशाचे रिट्विट यात करण्यात आले आहे. तसेच वांशिक शिवीगाळदेखील करण्यात आली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले, की जॅक डोर्सी यांचे अकाऊंट हॅक झाल्याचे आम्हाला कळून चुकले आहे, त्यावर चौकशी सुरू आहे. ट्विटरला त्यांच्या प्रमुखांचे अकाऊंट सुरक्षित ठेवता येत नाही, त्यांनी दोन पद्धतींच्या ओळख तपासणी तंत्राचा वापर करून अकाऊंट सुरक्षित का ठेवले नाही, असे टीकात्मक संदेश यानंतर ट्विटरवर आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव ट्विटरने आशयाची सफाई मोहीम सुरू केली असतानाच त्यांचे प्रमुख डोर्सी यांचे अकाऊंट हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.