वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची माहिती
लासुर्णे- इंदापूर तालुकाच्या पश्चिम भागातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये डी.जे.लावल्यास तसेच वर्गणीसाठी सक्ती, दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या संबंधित मंडळावर खंडणीचा गुन्हे दाखल करुन पुढील वर्षीची परवानगीही नकारण्यात येणार आहे, असा इशारा वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिला.
जंक्शन (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशउत्सव शांततेमध्ये पार पाडवा यासाठी गणेशमंडळ व पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पवार बोलत होते. ते म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांनी डी.जे. व गुलाल विरहित गणेशोत्सव साजरा करावा. सध्याच्या काळातील युवा पिढी मोबाइलचा जास्त वापर करीत आहे. सोशल मिडीयाच्या काळामध्ये युवकांना पारंपरिक खेळांचा विसर पडला आहे. गणेशमंडळांनी लेझीम, ढोल, ताशा, सुरपाट्या व इतर पारंपरिक खेळाचे आयोजन करावे. डी.जे.च्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास करावा लागत असुन ध्वनी प्रदूषण जास्त होत असल्याने सार्वजनिक उत्सव मंडळांनी डी.जे.लावू नये, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.